Sanjay Nirupam On Shivsena (Photo Credits: File Image)

औरंगाबाद शहराच्या नामांतरणाच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर केले जावी, अशी मागणी भाजप आणि मनसेने लावून धरली आहे. तर, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे. मात्र, शिवसेनेच्या या भुमिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनीदेखील शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. हे सरकार तीन पक्षांचे आहे. मात्र, सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणेल तर, नक्कीच नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

औरंगजेब यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त राहिले आहे. संभाजीराजे हे एक महान योद्धा होते. त्यांचा त्याग महान आहे. याबाबत काहीच मतभेद नाहीत. मात्र, सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणेल तर नक्कीच नुकसान होईल, स्वतः निर्णय घ्यावा.” असा इशारा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच औरंगाबादचे नाव बदलणे हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. परंतु सरकार तीन पक्षांचे आहे, हे देखील विसरता कामा नये. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमांवर चालतात. कुणाच्या वैयक्तिक कार्यक्रमावर नाही. किमान समान कार्यक्रम काम करण्यासाठी तयार केला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असेही संजय निरुपम म्हणाले आहेत. हे देखील वाचा- MNS: वाढीव वीज बिलांवरुन मनसे आक्रमक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावून राज्य सरकारवर केली टीका

ट्विट-

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. मात्र, या सरकारमधील तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. तसेच महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गंत वादातून पडेल, अशी टीका विरोधी पक्षांकडून वारंवार केले जात आहे. यामुळे विरोधी पक्षांचे भाकीत खरे ठरते की काय? हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.