Nana Patole,Prithviraj Chavan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाकडून महाराष्ट्रात पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात महाराष्ट्र काँग्रेस (Congress) पक्ष प्रदेशाध्यपद विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे सोपवले जाण्याची चर्चा आहे. नाना पटोले यांच्याकडे जर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद गेले तर, विधानसभा अध्यक्ष पदावर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत सहभाही आहे. मात्र, पक्षाकडे मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा सत्तासहभाग जोरात चर्चेत आला होता.

महाविकासआघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री असणारे बाळासाहेब थोरात हे सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडेच काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते पद आहे. त्यामुळे एकाच व्यक्तिकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यात बाळासाहेब थोरात हे मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांची कार्यशैलीही काँग्रेसला साजेशी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, 2014 पासून काँग्रेस पक्षाचा विविध निवडणुकांमध्ये होत असलेला दारुन पराभव पाहता काँग्रेसला सध्या आक्रमक असलेल्या प्रदेशाध्यक्षाची आवश्यकता आहे.

नाना पटोले हे आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. पटोले हे लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजप तिकीटावर खासदार म्हणून निवडूण आले. मात्र, अल्पावधीतच थेट नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंगा घेणारे आणि भाजप सदस्यत्वासोबत खादारकीचा राजीनामा देऊन आपला शब्द खरा करुन दाखवणारे पटोले हे पहिले खासदार ठरले. पुढे त्यांनी स्वगृही प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. सध्या ते विधानसभा अध्यक्ष आहेत. अत्यंत नाजूक काळात पटोले यांच्या आक्रमक स्वभावाचा काँग्रेसला फायदा होईल, असे मानले जात आहे. (हेही वाचा, Coronavirus: पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडले देवेंद्र फडणवीस यांचे आकडे; पोस्ट केला Video, दिले आव्हान)

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अत्यंत नेमस्त आणि अभ्यासू व्यक्तिमत्व अशी चव्हाण यांची ओळख आहे. तसेच, चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ आणि अनूभवी नेत्याला सत्तेबाहेर ठेवणे काँग्रेसच्या भविष्यातील वाढीसाठी आणि प्रतिमेसाठी फारसे चांगले ठरणार नाही. त्यामुळे चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा अध्यक्षपदासाठी किती इच्छूक आहेत यावर बरेच काही अवलंबून आहे. दरम्यान, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यात आपण नेहमीच तयार असतो. आजवरही पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी पार पाडली आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.