राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर, शिवसेना, राष्ट्रावादी आणि कॉंग्रेस पक्षांनी आले पाय घट्ट रोवायला सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला. कोल्हापूरच्या महापौरपदी (Kolhapur Mayor) काँग्रेसच्या (Congrees) निलोफर आजरेकर (Nilofer Ajarekar) यांची निवड झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे, निलोफर यांच्या विरुद्ध उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवाराला फक्त 1 मत मिळाले आहे. आजरेकर या 48 विरुद्ध एका मताने विजयी झाल्या आहेत.
भाजप-ताराराणी आघाडीने महापौरपदाच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे भाजप उमेदवाराला आपल्या पक्षाची मते मिळू शकली नाहीत. यामुळेच आजरेकरच महापौर बनतील हे जवळजवळ निश्चित झाले होते.
अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत महापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महापौरपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये निलोफर आजरेकर या 50 व्या महापौर म्हणून निवडून आल्या. त्यांच्या विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार अर्चना पागर उभ्या होत्या, त्यांना फक्त 1 मत मिळाले. (हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; महापौरपदी भाजपच्या गीता सुतार यांची निवड)
या संपूर्ण निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी आघाडीचे केवळ कमलाकर भोपळे सोडून बाकी सर्व नगरसेवक गैरहजर राहिले. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची गेल्या चार वर्षापासून कोल्हापुरात आघाडी आहे. मात्र या पक्षांनी महापौरपदाची खांडोळी केली, ज्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला. हा आरोप करत भाजप-ताराराणी आघाडीने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, 1978 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली, तर नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर होते. महत्वाचे म्हणजे 2018 पासून कोल्हापूरला तब्बल 5 महापौर लाभले आहेत.