लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असताना, महाराष्ट्रातही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा (Maharashtra Congress President) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. अखेर पक्षश्रेठींनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या शर्यतीत हर्षवर्धन पाटील यांचे नावही चर्चेत होते मात्र थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच या गोध्तीची अधिकृत घोषणा केली जाईल.
यावेळच्या निवडणुकीवेळी कॉंग्रेसने तगडी मोर्चेबांधणी के;ली होती. मात्र देशात अमेठी आणि राज्यात नांदेड अशा दोन्ही बालेकिल्ल्यात कॉंग्रेसच्या वाट्याला अपयश आले. लागोपाठ दुसऱ्यांदा लोकसभेत विरोध पक्षनेतेपद मिळवण्याइतपत देखील जागा न मिळाल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. स्वतः दिल्लीला जाऊन त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती, या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे वृत्त मिळत आहे. त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असे हायकमांडतर्फे त्यांना सांगण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा: बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी; राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी)
दरम्यान राज्यात कॉंग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षनेते हे पद आपोआप बाळासाहेब थोरात यांना मिळाले. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठीही त्यांच्या नावाचा निर्णय झाला आहे. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते अशी ओळख असलेले बाळासाहेब कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत.