बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी; राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी
Balasaheb Thorat | (Photo Credit: Facebook)

काँग्रेस नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. थोरात यांच्यासोबत काँग्रेसच्या इतर नेत्यांचीह विविध पदांवर निवड करण्यात आली आहे. यात आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विधानसभेतील काँग्रेस गटनेता, नसीम खान (Naseem Khan) यांची विधानसभा उपनेता, बसवराज पाटील (Basavaraj Patil) मुख्य प्रदोद तर, के. सी. पाडवी (K C Padvi), सुनील केदार (Sunil Kedar), जयकुमार गोरे (Jaykumar Gore) , यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), प्रणिती शिंदे (Praniti Shinde), शरद रणपिसे (Sharad Ranpise), रामहरी रुपनवार (Ramhari Rupnawar),भाई जगताप (Bhai Jagtap) यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबबत उत्सुकता असतानाच बाळासाहेब थोरात यांची निवड विधिमंडळ नेतेपदी करण्यात आली आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अहमदनगर जिल्हा हा मराहाष्ट्रातील सर्वात मोठा आणि सहकार चळवळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या विस्तारीत जिल्ह्याच्या राजकारणावर दोघांचीही चांगली पकड आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे दोघेही काँग्रेस पक्षाती एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राहिले आहे. गेली अनेक वर्षे अहमदनगर काँग्रेसने या दोघांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. सध्या काँग्रेस पक्षासाठी अत्यंत अडचणीचा काळ आहे. अशा स्थिती पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अत्यंत जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची गरज असताना पक्षाला सोडचिठ्ठी देण्यातच अनेक पक्षनेते कार्यकर्ते धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वात मोठी पोकळी पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षविरोधी धोरण आणि पदाचा राजीनामा हाही त्याचाच एक भाग मानला जात आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पहिली विकेट! अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा; लोकसभा पराभवानंतर पक्षांतर्गत नेतृत्वबदलाचे स्पष्ट संकेत)

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देणारा नेता म्हणून बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने रिंगणात उतरवले आहे. बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंत राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरु झाली आहे.