महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पहिली विकेट! अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा; लोकसभा पराभवानंतर पक्षांतर्गत नेतृत्वबदलाचे स्पष्ट संकेत
Ashok Chavan | (Photo Credits: Twitter)

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. या पराभवाची सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते थेट राष्ट्रीय पक्षाध्यक्षांपर्यंत जोरदार कारणमिमांसा सुरु आहे. या पार्श्वभूमिवर नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. अर्थात, हा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला. मात्र, त्यामुळे देशभरातील काँग्रेसमध्ये जायचा तो संदेश गेला. या संदेशाची परिणीती म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress Chief) पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक पराभवाची जबाबदारी स्वीकारत माझ्यासह देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा असे म्हटले होते. तसेच, या पराभवास राहुल गांधी हे जबाबदार नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यापूर्वीच उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीही आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिली होता. तसेच, राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन योगेश मिश्रा यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आता अशोक चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, हा राजीनामा देताना पक्षांतर्गत फेरबदल करण्याचा राहुल गांधी यांना अधिकार आहे. त्यामुळे मी माझा राजीनामा त्यांच्याकडे पठवला आहे. अशोक चव्हाण हे लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचेही एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावर कायम; पक्षाच्या कार्यकारिणी समितीने फेटाळला राजीनामा; देशभरात प्रादेशिक नेतृत्व बदलाचे संकेत)

अशोक चव्हाण ट्विट

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्यापूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्विकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी या पराभवास ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे म्हटले होते.