काँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न
Congress flags | Representational image | (Photo Credits: PTI)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress)ने उमेदवारांची आज नववी यादी जाहीर केली. या यादीमध्ये 10 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमधील हे उमेदवार आहेत. यापैकी 4 उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. काँग्रेसने चंद्रपूर येथे विनायक बांगडे यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. तर त्यांच्या जागी सुरेश (बाळू) धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयातून राजीनामा देण्याचा विचार करत असलेल्या अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला असल्याचा दिसून येतो.

या नवव्या यादीद्वारे चंद्रपुरातून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे, अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपुरातून विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. चंद्रपूरबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचही मत विचारात घेण्यात आले नाही त्यामुळे त्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. (हेही वाचा: 'मातोश्री'वर राजीनामा देण्यासाठी व आंदोलन करण्यासाठी निघालेल्या रवी गायकवाड समर्थकांना पोलिसांनी अडवले)

एका नाराज कार्यकर्त्याने याबाबत फोन करुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचार केली होती. त्यावर माझे पक्षात कुणी एकत नाही, आपणच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. काल ही ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत कॉंग्रेसने चंद्रपुरातून धानोरकरांना उमेदवारी दिली आहे.