Congress | (File Image)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार आहे.  या बैठकमध्ये फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.  विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं समोर आले होते. या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित  राहणार आहेत.  (हेही वाचा - Ajit pawar Jan Sanman Melava: अजित पवारांचे बारामतीमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन; राज्यव्यापी जनसन्मान मेळाव्याचे आयोजन)

विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीनंतर फुटीर आमदारांवर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले यांनी मान्य केलं आहे. काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे. वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आले आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.  ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्यांना सोडला जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडलं ते वरिष्ठांना कळवलं असल्याचे पटोळे यांनी सांगितले.