ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पूजा तडस यांच्या 17 महिन्यांच्या मुलालाही पत्रकार परिषदेत आणण्यात आलं होतं. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या गोष्टीवर आक्षेप घेतला असून सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्याविरोधात अंधारेंनी पत्रकार परिषद घेत त्या परिषदेत 17 महिन्यांच्या मुलाला मंचावर आणले होते. (हेही वाचा - Pooja Tadas Accused Ramdas Tadas: भाजपचे रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, सुषमा अंधारेंच्या पत्रकार परिषदेत PM नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी याचना)
नागपूर येथे ठाकरे गटाचे नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पूजा तडससोबत पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांना बाळ घेऊन परिषदेत बसवले होते. त्यावरून अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान पूजा तडस यांनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. लोखंडी रॉडने मारहाण केली, बाळ कुणाचं असं विचारून मला DNA टेस्ट करायला सांगितली. चारित्र्यावर संशय घेतल्याचे आरोप पूजा तडस यांनी केले होते.
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहिलं आहे, याबाबत कठोर कारवाईची मागणी केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार, प्रचारसभा, मोर्चा, घोषणाबाजी, पोस्टर चिकटवणे अशा निवडणुकीसंदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही.