प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

समुद्रमार्गे देशात अनेक संशयित पाय ठेवत असतात. 26/11 चा हल्ला असाच समुद्रातून आलेल्या संशयितांमुळे झाला होता. या पार्श्वभूमीवर वसईजवळील समुद्रात पाणजू बेटानजीक, 6 संशयित बोटींना पकडून तटरक्षक दलाने फार मोठी कामगिरी केली आहे. या बोटी समुद्रात बेकायदेशीररित्या प्रवास करीत होत्या. 6 बोटींचा पाठलाग करून, त्यातील दोन बोटी ताब्यात घेत बोटीत असणाऱ्या 14 बांगलादेशी संशयितांना कोस्टगार्डने पकडले आहे. मात्र इतर 4 बोटी आणि त्यातील लोक पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या संशयितांकडे कोणतीही ओळखपत्रे किंवा बोटीची कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे तटरक्षक दलाने त्यांना वसई पोलिसांकडे सोपवले आहे.

तटरक्षक दलाकडून ‘सजग’ या मोहिमेंतर्गत अरबी समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. आज सकाळी गस्त घालत असताना, पाणजू बेटाजवळ समुद्रात 6 बोटी संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तटरक्षक दलाने त्यांचा पाठलाग सुरु केला. या पाठलागात 6 पैकी 2 बोटी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र 4 बोटी किनाऱ्यालगत लावून त्यातील सर्व लोक तिवरांच्या जंगलात पसार झाले.

ताब्यात घेतलेले लोक भाषेवरून ते बांगलादेशीय वाटत असल्याने कोस्टगार्डने त्यांना पकडून वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांची नावे, आबिल शेख (25), शफीकुल (27),आहाजित (33), मोईद्दीन (45), इस्लाम (35), बी.शेख (22), शैफुल (27), एन मुल्ला (45), रफीगुल (19), शहीफुल (27), जे मुल्ला (40), मोंडल (28), पायनल (38), इब्राहिम शेख (25) अशी आहेत.