अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) कोकण परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड, ठाणे, पालघर, मुंबई जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. आता चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) शुक्रवारी 21 मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. दुसरीकडे आज तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पडझड झालेल्या घरांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोकणातील फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या फळ बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री या प्रदेशाचा दौरा करत आहेत.
Maharashtra CM Uddhav Thackeray to visit cyclone-affected Ratnagiri and Sindhudurg districts tomorrow. He will hold a review meeting with the local administration to assess the damages. pic.twitter.com/km1o4gQLx1
— ANI (@ANI) May 20, 2021
असा असेल कार्यक्रम-
सकाळी 8.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन.
8.40 वा. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक.
सकाळी 9.40 वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण.
सकाळी 10.11 वाजता वायरी, ता.मालवण येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.
सकाळी 10.25 वाजता मोटारीने मालवण येथे आगमन व ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. (हेही वाचा: मोदीजी हा भेदभाव का? तौक्ते चक्रीवादळानंतर गुजरातला केलेल्या मदतीवरुन पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र)
सकाळी 11.05 वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
या पहाणीनंतर सकाळी 11.30 वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक.
चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण व दुपारी 12.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
दरम्यान, आज तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये, वीज, रस्ते, पाणीपुरवठा योजना यांची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात यावी. तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता ज्या लोकांच्या घराचे नुकसान झाले आहे त्याची दुरुस्ती लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्तांना अन्न धान्य केरोसिन व जीवनावश्यक साहित्याची तत्काळ मदत करा, असे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले.