मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजनासाठी शरद पवाराच्या NOC ची गरज नसावी- प्रवीण दरेकर
Uddhav Thackeray and Pravin Darekar (Photo Credits: PTI and FB)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे राम मंदिराच्या भूमिपूजनावर केलेले वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांकडून टीका होताना दिसत आहे. अशा वेळी सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेले महाविकासआघाडीचे नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याची संधी विरोधकांनी काही सोडली नाही. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना राम मंदिर भूमिपूजनासाठी शरद पवारांच्या NOC ची गरज नसावी" असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी लगावला आहे. 19 जुलै ला सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी "'काहींना वाटतं की मंदिर बनवल्याने कोरोना महामारीचा नाश होईल. ' अशा आशयाचं वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

यावर एकूणच भाष्य करत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आता राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

हेदेखील वाचा- अयोद्धा राम मंदिर भूमीपूजन वरील शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपा नेत्या उमा भारती यांची टीका - 'PM मोदी नव्हे भगवान राम विरोधी वक्तव्य' असल्याचं मत

एवढंच नाही तर त्यांनी ही देखील आठवण करुन दिली की उद्धव ठाकरे म्हणाले होते की ‘पहले मंदिर फिर सरकार’ मात्र ते आधी सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि आता राम मंदिर होतंय. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी शरद पवारांच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज उद्धव ठाकरेंना नसावी असा टोला त्यांनी आता लगावला आहे.

दरम्यान महाराष्ट्र शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भूमीपुजनाचं आमंत्रण आहे का? या प्रश्नावरही आपली मत व्यक्त केली आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण येईल किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही. तो काही आमच्यासाठी मानापमानाचा विषय नाही. आमचं थेट नात जोडलेल आहे प्रभू रामचंद्र आणि अयोध्येशी.