अयोद्धा राम मंदिर भूमीपूजन वरील शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपा नेत्या उमा भारती यांची टीका - 'PM मोदी नव्हे भगवान राम विरोधी वक्तव्य' असल्याचं मत
Uma Bharti (Photo Credit: FaceBook)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अयोद्ध राम मंदिर भूमीपुजनावर एक वक्तव्य दिल्यानंतर आता त्यावर राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. पूर्व केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी देखील आता शरद पवारांवर निशाणा साधला आहे. दरम्यान शरद पवारांचे वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधी नसून भगवान राम विरोधी असल्याचं उमा भारती यांचं मत आहे. रविवार (19 जुलै) दिवशी एका दौर्‍या दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये एनसीपी प्रमुख पवारांनी 'काहींना वाटतं की मंदिर बनवल्याने कोरोना महामारीचा नाश होईल. ' अशा आशयाचं वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं होतं. त्यावर आज उमा भारतींनी प्रतिक्रिया दिली आहे.

ANI शी बोलताना उमा भारती म्हणाल्या, ' शरद पवार यांचं वक्तव्य हे भगावान रामद्रोही आहे.' येत्या 5 ऑगस्टला अयोद्धेमध्ये राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. यावरून शरद पवारांना त्याचं मत विचारताच त्यांनी ' आम्हांला कोरोना पासून लोकांना सुरक्षित ठेवणं हे प्राधान्याचं वाटतं, पण काहींना कोरोना पेक्षा अयोद्धा मंदिर महत्वाचं वाटतं. त्याच्यामुळे महामारीतून आपली सुटका होईल असं वाटतं. ' असे म्हटले होते.

ANI Tweet

दरम्यान महाराष्ट्र शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भूमीपुजनाचं आमंत्रण आहे का? या प्रश्नावरही आपली मत व्यक्त केली आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण येईल किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही. तो काही आमच्यासाठी मानापमानाचा विषय नाही. आमचं थेट नात जोडलेल आहे प्रभू रामचंद्र आणि अयोध्येशी. तर संजय राऊत यांनी देखील आम्हांला अयोद्धेचा रस्ता ठाऊक असल्याचं म्ह्टलं आहे.