मुंबई: BEST च्या ताफ्यात दाखल झाल्या 26 नव्या इलेक्ट्रिक बस; पहा काय आहे खास!
Electric Buses । Photo Credits: Twitter/ Best Bus

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST)च्या ताफ्यामध्ये आज (4 डिसेंबर) 26 इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाला FAME II योजनेअंतर्गत 340 मंजूर इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील २६ बसेसचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. दरम्यान उर्वरित बस टप्प्या टप्प्याने 2022 पर्यंत येणार आहेत.

मिडी म्हणजेच लहान आकारातील आणि conventional म्हणजे नियमित बस अशा दोन्हींचा यामध्ये समवेश आहे. मीडी बस मध्ये सिटींग कॅपॅसिटी 31 तर उभ्याने प्रवास करण्यासाठी 12 जणांची क्षमता आहे. तर conventional बस मध्ये 60 जण बसून प्रवास करू शकतात तर 20 जण उभ्याने प्रवास करू शकतात. दोन्ही बस या एकदा चार्ज केल्यानंतर अंदाजे 200 किमी पर्यंत प्रवास करू शकतात. वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी अशाप्रकारे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय म्हणून पाहिलं जातं आहे. यामधून धूर बाहेर पडत नसल्याने प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे.

केंद्र सरकारच्या Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric vehicles म्हणजेच FAME-II अंतर्गत घेण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारची ही योजना देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

बेस्ट बस चालकांना या वाहनांसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या लांब पल्ल्यावरदेखील चालवल्या जाणार आहेत. 2013 पासून मुंबईत इलेक्ट्रिक बस दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यावेळी सुरूवातीला 6 इलेक्ट्रिक बसेस, 2016 मध्ये 40 आणि आता 340 बस दाखल केल्या जातील. दरम्यान मुंबई लोकलनंतर शहरात सार्वजनिक प्रवासात बेस्ट बस मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.