सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. या आपल्या भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आपल्या राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी डॉक्टरांप्रमाणे महाराष्ट्र पोलिसही (Maharashtra Police) दिवस-रात्र जनतेची सेवा करत आहे. ही सेवा करत असताना अनेकांना कोरोनाची लागण देखील झाली तर अनेकांना जीव देखील गमवावा लागला. मात्र त्यातील ब-याच कोविड योद्धांनी कोरोनावर मात करुन पुन्हा ऑनड्युटी रूजू झाले. अशा या धैर्यशील, कर्तव्यनिष्ठ कोविड योद्धांचे (Covid Warriors) आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी खास पत्र लिहिले आहे. या पत्रात आपल्या कार्यात कुठेही कमी न पडणा-या या कोविड योद्धांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत विशेष आभार मानले आहे.
आज आपण सगळेच कोरोना सारख्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक सैनिक म्हणून आपण कोविड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात आज 2608 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 47 हजारांच्या पार- आरोग्य विभाग
महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या #कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार. प्रत्येक #कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.#CovidWarriors pic.twitter.com/Ou0jHpiBoQ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 23, 2020
त्याचबरोबर शस्त्रांपेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे असा मोलाचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आपल्यासारखे कोविड योद्धा या युद्धात उतरल्याने मुख्यमंत्री म्हणून मला मोठे बळ मिळाले आहे असेही त्यांनी या पत्रात सांगितले आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. त्यामुळे ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही असेही या पत्रात म्हटले आहे.
आज घडीला राज्यातील पोलीस दलात कोरोनबाधित एकूण 1671 रुग्ण आहेत. यामध्ये 174 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 1497 कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या पोलीस दलातील कोरोना बाधितांपैकी 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तब्बल 541 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.