CM Uddhav Thackeray Address Live Streaming: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्याला संबोधित करणार; 'या' ठिकाणी पाहू शकता भाषणाचे थेट प्रक्षेपण
CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANi)

कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत असलेली महाराष्ट्रातील जनता आणि सरकारसाठी आज मोठा दिवस होता. आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ‘मराठा आरक्षण’ (Maratha Reservation) बाबत सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि मराठा समाजाला सरकारी नोकरीत आरक्षण देणे या संबंधीचा राज्य कायदा ‘असंवैधानिक’ म्हणून फेटाळून लावला.

निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, मराठा समाजातील लोकांना आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही. त्यात मराठा आरक्षण देताना 50 टक्के आरक्षणाचा भंग केला जाऊ शकत नाही. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात फेटाळल्यानंतर राज्यात काही ठिकाणी आंदोलने सुरु झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज रात्री मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांचा हा संवाद तुम्ही 'या' ठिकाणी सोशल मिडियाच्या मार्फत पाहू शकता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्य निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वझे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. (हेही वाचा: 'माझ्या जीवितास काही झाले तर, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील' मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकीलांचा इशारा)

न्यायालयाच्या निकालाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, 'महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे.’