Uddhav Thackeray, K Chandrashekar Rao | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन के चंद्रशेखर राव हे 20 फेब्रुवारी रोजी मुंबईला येत आहेत. मुंबईमध्ये या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये भेट होणार आहे. दरम्यान, केसीआर यांनी फेडरल न्यायासाठी सुरु केलेल्या लढ्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती के चंद्रशेखर राव यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के चंद्रशेखर राव यांच्यात होणाऱ्या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तसेच, जोरदार चर्चाही आहे. काही राजकीय जाणकाऱ्यांच्या मते राष्ट्रीय पक्षांविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी उभारण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच हे नेते एकमेकांना भेटत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नुकत्याच मुंबईमध्ये आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. (हेही वाचा, Devendra Fadnavis on Aditya Thackeray: खंजीर कोणी खुपसला? आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर)

ट्विट

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या आगोदरच स्पष्ट केले आहे की, भाजप आणि एनडीएविरुद्ध राजरीय पक्षांनी एकत्र यायला हवे. यासाठी लवकरच ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राव यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ते मुंबईला जाऊ शकतात. तर ममता बॅनर्जी या राव यांना भेटण्यासाठी हैदराबादला येण्याची शक्यता आहे. राव यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्दर मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या लोकविरोधी नितीला विरोध करायला हवा. त्यासाठी भाजपविरोधात विविध राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे.