मुख्यमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde यांच्या शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी (Shiv Sena Candidate List) जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिवसेना पक्षाकडून 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. ज्यात सर्व विद्यमान खासदारांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासह नाशिक आणि यवतमाळ या जागांवरील उमेदवार मात्र अद्यापही जाहीर करण्यात आले नाहीत हे विशेष. त्यामुळे मुख्यमंत्रीपूत्र श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांच्या नावाशिवाय ही यादी जाहीर झाली आहे. यादीनुसार राहुल शेवाळे यांना मुंबई दक्षिण मध्य, संजय मंडलिक यांना कोल्हापूर, तर धैर्यशील माने यांची हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. जाणून घ्या प्रमुख लढती आणि शिवसेना उमेदवार यादी.
शिवसेना उमेदवार यादी
मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
कोल्हापूर - संजय मंडलिक
शिर्डी - सदाशिव लोखंडे
बुलढाणा - प्रतापराव जाधव
हिंगोली - हेमंत पाटील
मावळ - श्रीरंग बारणे
रामटेक - राजू पारवे
हातकणंगले - धैर्यशील माने
'ठाणे' कोणाचे? घोळ कायम
शिवसेना पक्षाने पहिल्या आठ जागांची यादी जाहीर केली असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांचे पूत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा या यादीत समावेश नाही. श्रीकांत शिंदे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. महायुतीच्या जागावाटपामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष आणि खास करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिक आग्रही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडावेत अशी भाजपची भूमिका आहे. तर दोन्ही मतदारसंघ हे आमचे घरचे मैदान आहेत. त्यावर कसे पाणी सोडणार असा मुख्यमंत्र्यांचा युक्तीवाद असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला नाशिक मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्यानेसुद्धा शिंदे यांची अडचण झाली आहे. दरम्यान, वाशीम लोकसभा मतदारसंघात सलग पाच वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावास खुद्द भाजपचाच विरोध आहे. या ठिकाणी शिवसेनेने संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी, असा भाजपचा आग्रह असल्याचे समजते. (हेही वाचा, Actor Govinda Ahuja joins Shiv Sena: अभिनेता गोविंदा यांचा शिवसेना पक्षात प्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत)
शिवसेना (UBT) विरुद्ध शिवसेना प्रमुख लढती
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे
दक्षिण मध्य मुंबई - अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव
मावळ- संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे
दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी भाजपकडून 24, काँग्रेसकडून 12, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 17, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 2 तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडने आतापर्यंत 9 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत.