Eknath Shinde At Goa Hotel: शपथ घेतल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याला रवाना, हॉटेलमधील आमदारांकडून जल्लोशात स्वागत
CM Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली. त्या आधी त्यांनी गोवा (Goa ) येथील हॉटेलमध्ये असलेल्या समर्थक आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे एक बैठकही घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री उशिरा  थेट गोवा (Eknath Shinde At Goa Hotel) गाठले. गोव्याला जाऊन त्यांनी हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या समर्थक आमदारांची भेट घेतली. या वेळी या आमदारांनी त्यांचे जल्लोशात स्वागत केले. महिला आमदारांनीही मोठ्या उत्साहात त्यांना ओवाळले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समर्थक आमदारांशी चर्चा करतानाचे काही फोटोही एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे शेअर केले. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला सत्ताबदल हा मोठा नाट्यूपूर्ण ठलला. एक आठवड्याहून अधिक काळ महाराष्ट्राबाहेर वास्तव्याला असलेले एकनाथ शिंदे राज्यात दाखल झाले. मुंबई विमानतळावरुन ते तडक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीस गेले. राज्यपालांना भेटून त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. (हेही वाचा, Eknath Shinde Political Journey: जाणून घ्या राज्याचे होणारे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास)

राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे हा शपथविधी सोहळा अगदीच साधेपणाने झाला. इतका साधेपणाने की एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांपैकी एकही आमदार या शपथविधी सोहळ्यास हजर नव्हता. त्यामुळे शपथविधी संपताच समर्थक आमदारांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे हे गोव्याला रवाना झाले.