Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात माजलेल्या गदारोळाचा अंत आता झाला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आज राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. फडणवीसांची ही घोषणा एक मास्टरस्ट्रोक समजली जात आहे. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री होतील. या पार्श्वभुमीवर जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास.

एकनाथ शिंदे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1964 साली झाला. लहानपणीच ते ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यातील मंगल हाईस्कूल शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले. पुढे त्यांनी ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला. यादरम्यान वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1984 साली त्यांना किसन नगर येथील शाखाध्यक्ष पद मिळाले.

एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे प्रभावित होऊन, आनंद दिघे यांनी त्यांना थेट नगरसेवकाचे तिकीट दिले. 1997 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2001 मध्ये त्यांना ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेपद मिळाले. त्यानंतर त्यांना आमदारकीचे तिकीटही देण्यात आले. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर टाकली. महत्वाची बाब म्हणजे, 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता, परंतु एकनाथ शिंदे जिंकून आले होते. 2004 पासून ते शिवसेनेचे ठाण्याचे आमदार राहिले आहेत. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (2009, 2014 आणि 2019)) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (2004) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.  जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे आज लोकसभेत खासदार आहेत.

2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना व भाजपची युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. या सत्ता संघर्षादरम्यान एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, परंतु ही माळ उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडली. यावरून शिंदेच्या गोटामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले होते. उद्धव ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. मागील अडीच वर्षांपासून ते नगर विकासमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होते. (हेही वाचा: एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

आता 2022 मध्ये विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. गेल्या आठवडाभरापासून यासंदर्भात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे अशी बंडखोर आमदारांची इच्छा होती, परंतु तसे घडले नाही. त्यानंतर काल उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपची साथ मिळाली असून, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.