Shivsena 53rd Anniversary: विधानसभा निवडणूकीत न भूतो असा विजय होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
CM Devendra Fadnavis at Shivsena 53rd Anniversary (Photo Credits: Twitter)

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी येथे आलो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना म्हणाले. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा 53 व्या वर्धापन दिन सोहळा रंगला. उद्धव ठाकरे यांचा मोठे बंधू असा उल्लेख करत दोन भावांमध्ये असलेले तणाव दूर करुन देश आणि राज्याच्या हितासाठी एकत्र आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Shivsena 53rd Anniversary: पश्चिम बंगाल राज्यात ममता बॅनर्जी शिवसेनेच्या भूमिकेत: उद्धव ठाकरे)

तसंच वाघ-सिंहाची जोडी एकत्रित आल्यानंतर जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे कितीही आघाड्या आल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. वाघ आणि सिंहाच्या युतीला जनतेने अभूतपूर्व यश दिलं आणि विधानसभा निवडणूकीतही न भूतो असा विजय होईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्तवला. (मराठी माणसांच्या हक्कासाठी झटणाऱ्या शिवसेना पक्षाच्या आतापर्यंतच्या प्रवासाच्या काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या)

आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्वाचं आहे. शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य सरकाराची कामगिरी राहिल. तसंच महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

लोकसभेत भाजप आणि शिवसेना पक्षाने जणू एकच पक्ष असल्यासारखं काम केलं असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला समर्थ नेतृत्व दिलं आहे, अशा शब्दांत त्यांचं कौतुकही केलं.