मागच्या वर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात फुटणाऱ्या हंडीसोबत शासनाचे सारे आदेश धुडकावून ‘गणपतीत डॉल्बी वाजणारच’ असा आदेश खुद्द उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी जाहीर केला होता. ‘डॉल्बी वाजणारच मग गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, असे ते म्हणाले होते. मात्र ऐन विसर्जनावेळी ते मिरवणुकीत सामील झाले नाहीत. आता यावर्षीही पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी, डॉल्बी लावणाऱ्या मंडळांची ध्वनिक्षेपक यंत्रणा तत्काळ जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे याआधीच उदयनराजे यांनी विसर्जनावेळी डॉल्बी लावण्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही दिग्गज आमनेसामने उभे ठाकणार असे चित्र दिसत आहे.
कोर्टाचा आदेश असतानाही पुन्हा एकदा 'आपण डॉल्बी वाजवणारच’ असा पवित्रा उदयनराजे यांनी घेतला आहे. याबाबत बोलताना डॉल्बीमुळे इमारती पडल्याचे सांगितले जाते, मात्र असे असते तर सर्जिकल स्ट्राईकसाठी विमानांऐवजी डॉल्बीच वाजवले असते, असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे. दुसरीकडे फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी डॉल्बी वाजवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिला आहे. (हेही वाचा: नियमांना धाब्यावर बसवून साताऱ्यात डॉल्बी वाजणारच !)
दरम्यान, लोकांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालक करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. यासाठी मिरवणूक मार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू आहेत. सध्या यामध्ये राजे व्यस्त आहेत. मात्र सातारकरांनी डॉल्बी वाजवणारच असा निर्णय घेतला तर, त्याचे स्वागत जिल्ह्यातील अधिकारी कसे करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.