दहीहंडीचा उत्सव साताऱ्यात चांगलाच रंगला आणि याच कार्यक्रमात खा. उदयनराजेंचा दबदबा आजही कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचा प्रत्यय सातारकरांना आला. दहीहंडीच्या कार्यक्रमात फुटणाऱ्या हंडीसोबत शासनाचे सारे आदेश धुडकावून ‘गणपतीत डॉल्बी वाजणारच’ असा आदेश खुद्द खासदारांनी जाहीर केला. आणि ‘डॉल्बी वाजणारच मग गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, ये तो अभी ट्रेलर, पिक्चर बाकी है. डॉल्बी कोण बंद करताय बघूच. डॉल्बीवर मीच बसणार आहे’ अशा शब्दात खासदारांनी जणू कायद्यालाच आव्हान दिले. साहजिकच १८ लाख समर्थकांच्या खासदारांनीच आदेश दिल्यामुळे या आदेशाचे युवकांनी जल्लोषात स्वागत केले.

साताऱ्यात छत्रपती घराणे आणि उदयनराजेंचे फार मोठे प्रस्थ आहे. आजही राजे म्हणतील ती पूर्व दिशा अशी साताऱ्यामधील स्थिती आहे. म्हणूनच ‘सातारा म्हणजे नो एसपी… नो कलेक्‍टर.. ओन्ली ऍण्ड ओन्ली उदयनराजे’ हा डायलॉग कोणी विसरता कामा नये. तसेच खासदारांचा अजून एक आवडता डायलॉग म्हणजे, ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी… तो मै खुद की भी नही सुनता.’ ह्या सर्व डायलॉगचे व्हिडीओ यु ट्युबवर आहेत. ते जिल्ह्यात आलेल्या नव्या अधिकाऱ्यांनी वेळीच बघून घ्यावेत. कारण, यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी ही वाजणारच अशी गर्जना खासदारांनी केली आहे. राजेंच्या या निर्णयामुळे साहजिकच सातारकरांचा आनद द्विगुणीत झाला आहे.

फार आधीपासून गणेशोत्सवात साताऱ्यामध्ये डॉल्बी वाजत आहे, मात्र काही वर्षांपूर्वी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान राजपथावर एक जीर्ण इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. आणि तेव्हापासून डॉल्बीवर बंदी घालण्यात आली. डॉल्बीच्या दणदणाटामुळे इमारत कोसळली असे सांगून झालेल्या दुर्घटनेचे खापर डॉल्बीवर फोडण्यात आले. आणि तेव्हपासून मिरवणुकीदरम्यान डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्येच बंधनकारक केली गेली. कोसळलेल्या इमारतीसाठी डॉल्बीला जबाबदार ठरवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र यंदाच्या वर्षी डॉल्बीमुळे त्रास होतो असे तुणतुणे वाजविणाऱ्या रूग्णालये, विद्यार्थी वसतिगृहांनी आता साऊंड प्रुफ सिस्टिीम बसवून घ्यावी, वृध्द व लहान मुलांना आवाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी एक दिवस पै-पाहुण्यांकडे जावून रहावे असा तोडगा खासदारांनी काढला आहे. कारण मोजक्‍या लोकांच्या त्रासासाठी डॉल्बीवरच बंदी? हा डॉल्बीप्रेमींवर घोर अन्याय आहे. असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले आहे.

प्रत्यक्ष खादारांचाच आदेश असल्याने आता भलेही गुन्हा दाखल झाला तरी चालेल, मंडळांची नोंदणी रद्द झाली तरी चालेल मात्र या वर्षी डॉल्बी वाजणार म्हणजे वाजणारच. अशी भूमिका सातारकरांनी घेतल्याने जिल्ह्यातील अधिकारी या निर्णयाचे कसे स्वागत करतीत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.