![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/12/cidco.jpg?width=380&height=214)
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) ची स्थापना 1970 मध्ये झाली. ही एक सरकारी संस्था असून, जी महाराष्ट्रातील शहरी भागांचे नियोजन आणि विकास करते. सिडकोकडे मोठ्या प्रमाणात जमीन आणि भूखंड आहेत, ज्यामुळे ती देशातील सर्वात श्रीमंत सरकारी संस्थांपैकी एक आहे. याशिवाय, ही सरकारी संस्था अतिशय स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घरे बांधते आणि ही घरे नागरिकांना लॉटरीद्वारे उपलब्ध करून दिली जातात. सिडकोची नवी मुंबई भागात ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना चालू आहे. या योजनेतील 26,000 घरांची लॉटरी 15 फेब्रुवारीला निघणार होती. मात्र अचानक ही लॉटरी रद्द करून पुढे ढकलण्यात आली. माहितीनुसार ही लॉटरी आता बुधवार, 19 फेब्रुवारीला दुपारी 2 ते 4 दरम्यान निघणार आहे.
सुरुवातीला 15 फेब्रुवारी रोजी होणारी सोडत अधिकृत कारणाशिवाय पुढे ढकलण्यात आली. शनिवारी अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती सिडकोने दिली. आता अहवालानुसार, अनेक अर्जदारांनी सिडकोला ई-मेलद्वारे माहिती दिली आहे की, ते सिडकोच्या लॉटरीची घोषणा होण्यापूर्वीच माघार घेत आहेत. यासाठी घरांच्या किमती महाग असल्याचे कारण देण्यात आले आहे. 'माझे पसंतीचे सिडको घर' ही योजना 12 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) श्रेणींसाठी एकूण 26,000 सदनिका देण्यात आल्या होत्या.
या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेली 26,000 घरे ही सिडको 27 नोड्समध्ये बांधत असलेल्या 67,000 घरांचा भाग आहेत. यापैकी 43,000 घरांना महारेराकडून आधीच मान्यता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत, सिडको 22 मजली इमारती बांधत आहे, ज्यापैकी 50 टक्के इमारती तळोजा नोडमध्ये आहेत. या घरांसाठी सोडत उद्या होणार असून, सोडतीचे ठिकाण बदललेले नाही. हा कार्यक्रम पनवेल तालुक्यातील तळोजा पंचानंद येथील सेक्टर-28 च्या फेज 1 येथील रायगड इस्टेटमध्ये आयोजित केला जाईल.
पारदर्शकता आणि सुलभतेसाठी सिडकोने लाईव्ह वेबकास्टिंगची व्यवस्था केली आहे. अर्जदारांच्या सोयीसाठी, सोडत सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवर देखील लाईव्ह स्ट्रीम केली जाईल. सिडकोने खारघर पूर्व (तळोजा), खांदेश्वर आणि खारघर या तीन ठिकाणी लाईव्ह स्क्रीनिंग सेंटर देखील स्थापित केले आहेत, ज्यामुळे अर्जदारांना रिअल-टाइममध्ये प्रक्रिया पाहता येईल. हे गृहनिर्माण युनिट्स नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली सारख्या नोड्समध्ये मोक्याच्या ठिकाणी आहेत. (हेही वाचा; Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, फक्त 20 दिवस बाकी; लाभार्थ्यांच्या खात्यावर 2100 रुपये होणार जमा?)
यामध्ये इडब्ल्यूएससाठी 25 लाखांपासून तर एलआयजीसाठी 97 लाखांपासून घरे उपलब्ध आहेत. या योजनेसाठी सिडकोला फक्त 22,000 अर्ज प्राप्त झाले. घरांच्या जास्त किमती हे, अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसादाचे एक महत्वाचे कारण मानले जात आहे. दुसरीकडे, या योजनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे. अर्जदारांना आपल्या पसंतीच्या 15 सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.