Merry Christmas 2020 Greetings (Photo Credits: File Image)

25 डिसेंबर, प्रभू येशूचा (Jesus Christ) हा जन्मदिवस संपूर्ण जगात ख्रिसमसच्या (Christmas 2020) रूपाने धुमधडाक्यात साजरा केला जातो. ख्रिश्चन बांधवांसाठी हा फार मोठा दिवस मानला जातो. येशू जन्मदिवसानिमित्त घर सजवले जाते, रोषणाई केली जाते, मिठाया बनवल्या जातात, ख्रिसमस ट्री, केक, संगीत, नृत्य, गीते अशा आनंदाच्या वातावरणामध्ये हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी एकमेकांना खास शुभेच्छा देतात. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र सायबरने (Maharashtra Cyber) सर्व नागरिकांना ख्रिसमसच्या आनंदमय पण हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र सायबरने आपल्या ट्वीटरवर काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी यंदाच्या ख्रिसमसला ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जनतेने कोणती काळजी घ्यावी याबाबत महत्वाचे संदेश दिले आहेत. पहिल्या मेसेजमध्ये सायबर सेल म्हणते, यंदाच्या ख्रिसमसला फेक वेबसाईट्सपासून सावध रहा. फसवणूक करणारे लोक तुमची वाट पाहताच असतील. दुसऱ्या मेसेजमध्ये म्हटले आहे, यंदाच्या ख्रिसमसला फिशिंग ई-मेल्सपासून सावध राहा, कदाचित तुमचा महत्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो.

पुढच्या संदेशात सायबर सेलने सांगितले आहे की, पब्लिक व्हायफायवरून शॉपिंग करणे बंद करा. तुमच्या बँक खात्याच्या माहितीला धोका असू शकतो. शेवटच्या संदेशात सायबर सेल म्हणते, सोशल मिडियावरून मिळणाऱ्या फ्रीबीज म्हणजेच मोफत मिळणाऱ्या भेटवस्तू घेणे टाळा. कारण यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. तर अशा प्रकारे महाराष्ट्र सायबरने या महत्वाच्या संदेशाद्वारे लोकांना ऑनलाईन होणारे नुकसान टाळण्यासाठीचे उपाय सांगितले आहेत. (हेही वाचा: Merry Christmas 2020 Messages: ख्रिसमसच्या दिवशी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून द्या नाताळच्या शुभेच्छा)

दरम्यान, ख्रिश्चन समाजातील लोक येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानतात आणि या धर्माच्या लोकांसाठी हा सर्वात मोठा सण मानला जातो. आता तर फक्त ख्रिश्चनच नाही तर इतर धर्मातील लोकही हा सण साजरा करतात. कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.