Kakasaheb Chitale

Kakasaheb Chitale Passes Away: चितळे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे (Kakasaheb Chitale) यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. चितळे उद्योग समूहाचे ते आधारस्थंभ म्हणून ओळखले जात. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चितळे उद्योग समूह जगभर प्रसिद्ध आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणे हा चितळे उद्योगसमूहाचा प्रमुख व्यवसाय आहे.

चितळे उद्योग समूहाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व 1939 मध्ये सांगली जिल्ह्यात असलेल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात झाली. भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे हे या उद्योग समूहाचे संस्थापक. भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी चितळे उद्योग समूहाचा पाया घातल्यानंतर या उद्योग समूहाची संपूर्ण जबाबदारी पुढे काकासाहेब आणि नानासाहेब चितळे यांच्याकडे आली. काकासाहेब आणि नानासाहेब या दोन्ही बंधुंच्या रुपात चितळे यांची दुसरी पिढी या उद्योगात आली. काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीत चितळे उद्योगसमूहाची मोठी वाढ झाली. हा उद्योग समूह आता केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर जगभरात पसरला आहे. या सर्व कामगिरीचे श्रेय काकासाहेब चितळे यांना दिले जाते.

दरम्यान, चितळे डेअरी आणि उद्योगसमूह ही एक दुग्धोत्पादक संस्था आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया, दूध पाश्‍चरायजेशन, विविध दुग्ध उत्पादने तयार करण्याचे काम ही कंपनी करते. महाराष्ट्र आणि भारतासह जगभरात नामांकीत म्हणून चितळे समूहाकडे पाहिले जाते. चितळे दूध, दही, तूप, भाकरवडी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ही या उद्योगसमूहाची ओळख आहे. प्रतिदिन 2.4 लाख लिटर दुग्धोत्पादन करण्याची ही कंपनी क्षमता ठेवते. ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते. काकासाहेब चितळे यांच्या निधनाने या कंपनीस मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.