
पुण्यासह (Pune) आसपासच्या भागात ‘चितळे बंधू मिठाईवाले’ (Chitale Bandhu Mithaiwale) हे मोठे नाव आहे. खासकरून बाकरवडीसाठी हे मिठाईचे दुकान प्रसिद्ध आहे. हे केवळ एक मिठाईचे दुकान नाही तर, पुण्याच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या बाकरवडीने पुण्याला जागतिक खाद्य नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. आता या पुण्यातील स्नॅक्स उत्पादक चितळे बंधू मिठाईवाले यांनी, एका स्थानिक व्यावसायिकाविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, या व्यावसायिकाने आपल्या लोकप्रिय ओळखीचा फायदा घेत एकाच ब्रँडच्या नावाने स्नॅक्स विकले आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. तक्रारीच्या आधारे, 'चितळे स्वीट होम'चे (Chitale Sweet Home) मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद प्रभाकर हे ‘चितळे’ या नावाने बाकरवाडीची विक्री करतात. माहितीनुसार ते, ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याशी निगडीत माहिती, जसे की त्यांचा ग्राहक सेवा क्रमांक, अधिकृत ईमेल पत्ता आणि उत्पादन तपशील वापरत आहेत. अशाप्रकारे मोठ्या ब्रँडच्या नावाचा गैरवापर हा केवळ आर्थिक नुकसानाचा प्रश्न नाही, तर त्यांच्या मेहनतीने कमावलेल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. चितळे बंधू मिठाईवालेचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले की, ‘गेल्या काही महिन्यांत, आम्हाला ग्राहकांकडून 'चितळे' नावाने विकल्या जाणाऱ्या बाकरवाडी उत्पादनाबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत.’
त्यांनी पुढे सांगितले की, ‘आमच्या टीमने बाजारातून हे उत्पादन खरेदी केले आणि पॅकेजिंगमध्ये महत्त्वाचे फरक लक्षात आले. पॅकेटवर छापलेले क्रेडेन्शियल्स आमचे होते, ज्याद्वारे ते उत्पादन आमच्या कंपनीशी जोडले गेल्याचे स्पष्ट होत होते, मात्र आतील उत्पादन आमचे नव्हते.’ हे खरेदी केलेले पॅकेट्स भोर येथील त्यांच्या इन-हाऊस लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, जिथे विश्लेषणातून मूळ आणि त्याच्यासारख्या दिसणाऱ्या या उत्पादनातील स्पष्ट फरकाची पुष्टी झाली. (हेही वाचा: Pune Man Tears Passport Pages: पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल)
वादग्रस्त पॅकेजिंगवर मराठीत 'चितळे स्वीट होम' असे लेबल होते, तसेच 'पुणेरी स्पेशल बाकरवडी' आणि स्नॅकचा फोटो होता. त्यानंतर त्याचा मालकाला अनेक वेळा इशारे देण्यात आले, मात्र ही फसवणूक आणि गैरवापर सुरूच राहिला. ज्यामुळे आता चितळे बंधू मिठाईवाले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस उपायुक्त (झोन 1) संदीप सिंग गिल म्हणाले की, प्रमोद प्रभाकर चितळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 318(2) (फसवणूक) आणि 350 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 क आणि 66 ड (ओळख चोरी) अंतर्गत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.