सिंधुदुर्ग (Sindhudurg) मधील चिपी विमानतळावरुन (Chipi Airport) पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे असं चित्र पाहायला मिळत आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटन 7 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं शिवसेनेने सांगितलं होतं. मात्र आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी देखील विमानाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केली आहे. त्यामुळे शिवसेना (ShivSena) आणि भाजप (BJP) मध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
यासंदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले की, "7 वर्षांपासून विमानतळ बांधून तयार होतं. आज सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटलो. त्यांची वेळ घेतली. त्यानंतर मी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली. उद्घाटनानंतर सिंधुदुर्ग, मुंबई आणि अन्य ठिकाणी विमान वाहतूक सुरु होईल," असंही ते म्हणाले. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या तारखेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "2014 पासून विमानतळ आम्ही बांधलं. आम्ही स्थानिक नाहीत का? त्यामुळे विमानतळाचं उद्घाटन आम्ही करणार. यात क्रेडीट घेण्याचा प्रश्न नाही."
त्याचबरोबर विमानतळाचे उद्घाटन संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते होणार असल्याने या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची गरज नसल्याचंही राणे म्हणाले. (मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास 3 तासांत? महाराष्ट्र सरकार 70 हजार कोटीच्या कोकण एक्सप्रेस च्या तयारीत)
दरम्यान, चिपी विमानतळाचं उद्घाटन 7 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली होती. त्यामुळे आता उद्घाटन नेमकं कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.