प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुलांच्या तस्करीच्या (Child Trafficking) एका मोठ्या घटनेचा पर्दाफाश केला आहे. दानापूर-पुणे एक्स्प्रेसने बिहारमधून महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या 59 मुलांची आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. मनमाडमधून 30 तर भुसावळ रेल्वे स्थानकातून 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. ही मुले तस्करीसाठी रेल्वेने आणली जात असून सांगली किंवा पुण्यातील मदरशात त्यांना आणण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय आहे. या मुलांसोबत असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध कलम 470 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे पोलिसांच्या पथकाने बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून सांगली मदरशात तस्करीच्या या कृत्याचा पर्दाफाश केला. दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून तस्करी करणाऱ्या या 59 मुलांची 30 मे रोजी भुसावळ ते मनमाड स्थानकादरम्यान सुटका करण्यात आली.

भुसावळ रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस भुसावळ यांना दानापूर-पुणे एक्स्प्रेस क्रमांक 01040 मधून बाल तस्करीची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भुसावळच्या एका सामाजिक संस्थेच्या मदतीने दानापूर-पुणे एक्स्प्रेस गाडी भुसावळला येताच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गाडीचा कसून शोध सुरू केला. या शोधात 8 ते 15 वर्षे वयोगटातील 29 मुलांना रेल्वे संरक्षण दलाने ताब्यात घेतले. त्यांना खाली उतरवण्यात आले. मुलांसोबतच एका संशयितालाही रेल्वे सुरक्षा दलाने खाली उतरवून पोलीस ठाण्यात नेले.

यानंतर भुसावळ ते मनमाडदरम्यान एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा शोध सुरू करण्यात आला. या शोध मोहिमेत आणखी 30 मुले आणि 4 संशयित सापडले. भुसावळ येथे ताब्यात घेतलेल्या 29 बालकांना जळगाव बालसुधारगृहात तर, मनमाड येथे ताब्यात घेतलेल्या 30 मुलांना नाशिक बालसुधारगृहात पाठविण्यात आले. यावेळी मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (हेही वाचा: कोल्हापुरात पकडला 63 अल्पवयीन मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा ट्रक; मदरशात शिकत असल्याचा दावा, बिहार-बंगालमधून आणले होते महाराष्ट्रात)

याप्रकरणी पाच संशयित आरोपींविरुद्ध भुसावळ व मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांच्या पालकांची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू केली जाईल.