Child Kidnapping Gang Busted: लहानमुलांची चोरी करुन त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी मुंबई येथील मारवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून टोळीती सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास अद्यापही सुरुच आहे. ही टोळी फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबावर लक्ष ठेऊन त्यांची मुले चोरत असे. या टोळीने आतापर्यंत किती मुलांची चोरी केली आहे आणि किती मुलांची विक्री केली आहे तसेच, या टोळीत आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, या पाठीमागे कोणते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात पुढे येणार आहेत.
प्राथमिक अंदाजामध्ये ही टोळी मुलांची तस्करी करणाऱ्या एखाद्या मोठ्या रॅकेटचा भाग असावी असा संशय आहे. ही टोळी मुले चोरत असे व ज्या जोडप्यांना मुले नसत किंवा होत नसत त्यांना ही मुले विक्री करत असे असेही प्राथमिक तपासात पुढे आले आहे. धक्कादायक म्हणजे ही टोळी वयानुरुप मुलांची किंमत ठरवत असे. जसे की, मूल जर एक ते दीड वर्षांचे असेल तर त्यासाठी जवळपास दीड-ते दोन लाख रुपये आकारत असे. या टोळीकडून इतरही अनेक प्रकरणांबद्दल माहिती मिळण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालील प्रमाणे
- रफान फुरखान खान (26 वर्षे)
- सलाहुद्दीत नुरमोहम्मद सय्यद (23 वर्षे)
- आदिल शेख खान (19 वर्षे)
- तौफिर इक्बाल सय्यद (26 वर्षे)
- रझा अस्लम शेख (25 वर्षे)
- समाधान जगताप
बीड पोलिसांनी अशाच एका प्रकरणाच नुकताच भांडाफोड केला होता. त्या प्रकरणातही एका 22 वर्षीय महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिला एक अपत्यही झाले. दरम्यान, तिच्या विवाहबाह्य संबंधांबाबत तिच्या पतीला माहिती कळताच त्याने तिला माहेरी आणून सोडले. याच काळात तिची ओळख माहेरच्या एका छाया नामक महिलेशी झाली. ज्या महिलेकडे एका वासूदेव भोजने नामक व्यक्तीचे येणेजाणे होते. या महिलेने 22 वर्षीय महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, तुझे मूल विवाहात अडथळा असल्याचे सांगितले. त्यावर वासूदेव भोजने नामक व्यक्तीने तिला सदर मुलाला आपले नाव देण्याची तयारी दर्शवली. तसेच, या मुलाला आपल्याकडे ठेवण्यास सांगितले. पुढे या मुलाची कोल्हापूरच्या महिलेद्वारे एजंट पाहून कर्नाटकच्या व्यक्तीमार्फत गोव्याच्या इसमाला विक्री झाली. अत्यंत गुंतागुंतीचे हे प्रकरण बीड पोलिसांनी मोठ्या चतुराईने उघडकीस आणले.