मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असतानाच संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवप्रतिष्ठान’ या संघटनेने बंद पुकारला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या 'उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत' या विधानावरुन हा बंद पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, आपण दिलेली संपाची हाक ही केवळ संजय राऊत आणि त्यांनी केलेल्या विधानाविरोधात आहे. या संपाचा सरकार किंवा शिवसेना अथवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ‘शिवसेना याचा अर्थ छत्रपती परंपरेचा चालू असलेला जो श्वासोच्छ्वास आहे, ते लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांना मी एकच विनंती करेन, की त्यांनी आवरावं. शिवसेनेला ज्याच्यामुळे बदनाम होण्याची वेळ येईल, अशी विधानं करणारे राऊत, त्यांना स्थानावरुन मोकळं करावं. शिवसेना ही सबंध देशात गेली पाहिजे, देशभरात वाढली पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. मात्र उद्धवरावांनी, संजय राऊतांना बाजूला करावं. शिवसेनेविषयी लोकांचं मत बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी’असही संभाजी भिडे यांनी म्हटलेआहे. (हेही वाचा, भाजपाला इंदिरा गांधी प्रिय झाल्याचा सर्वात जास्त आनंद: शिवसेना)
दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीत असताना असा संप घडवून आणणे म्हणजे हे राजकीय षडयंत्र असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, खरं तर संजय राऊत यांनी निश्चित काय म्हटलं आहे हे मला माहिती नाही. मी ते पाहिलं नाही आणि ऐकलंही नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. महत्त्वाचं म्हणजे मी स्वत: एखादी गोष्ट ऐकल्या, बोलल्याशिवाय कोणाला सल्ला देत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना काय सल्ला देणार यावर या प्रश्नाला बगल दिली आहे.