Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट, 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता
(Photo Credit: Twitter)

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. याचपाश्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यातील राज्यपालनियुक्त 12 आमदाराच्या नियुक्तीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली होती.

राज्यमंत्रीमंडळाकडून नोव्हेंबर 2020 रोजी 12 आमदारांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली होती. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्ती 12 आमदाराचा निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्ती 12 आमदारांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. एवढेच नव्हेतर, या मुद्द्यावरून राज्यपाल यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका केली जात आहे. याचमुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. यामुळे लवकरच राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- Pune: भाजप नेत्यांकडून कोरोना निर्बंधाचे उल्लंघन; चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे, काँग्रेसचे रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर. तर, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.