Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत दिग्गजांची बैठक
Maratha Reservation (Photo Credits: File Photo)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती देऊन राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. यानंतर मात्र विरोधक आक्रमक झाले आहे. या मुद्द्यावरुन राज्य सरकारला वारंवार लक्ष्य केलं जात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) आज (28 फेब्रुवारी) एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञ बैठकीत सहभागी होणार आहेत.

सह्याद्री अतिथिगृहावर आज दुपारी 4 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारे सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, 8 मार्च रोजी मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या या आजच्या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नासंबंधित काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

9 सप्टेंबर 2020 रोजी राज्यातील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षण, नोकरी मधील मराठा आरक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे राज्यभरात वादंग निर्माण झाला. दरम्यान, 8 मार्च पासून पुन्हा सुनावणी सुरु होणार असून 8 ते 10 मार्च 2021 हे दिवस याचिका कर्त्यांची बाजू ऐकण्यात येईल. तर 12, 15, 16 मार्च 2021 हे दिवस राज्य सरकार बाजू मांडेल. 17 मार्च दिवशी मध्यस्थांची बाजू ऐकण्यात येईल तर 18 मार्च दिवशी केंद्र सरकार आपले मुद्दे मांडेल.