मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद संदर्भात बोलावली महत्वाची बैठक
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) लॉकडाऊनमध्ये झालेले अनेक सण सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे केले आहे. रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवानी साजरी केली होती. परंतु, बकरी ईदसाठी (Bakri Eid) बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर आहे. कारण, बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकऱ्याची कुर्बानी देणे भाग आहे. यावर उपाय केला जाऊ शकतो का? तसेच यावर काय मार्गही काढता येईल का? यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात बकरी ईद साजरी होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेत बैठक बोलावली आहे. महत्वाचे म्हणजे बकरी ईद संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही कारणासाठी गर्दी करणे आपल्याला परवडणारे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद देखील घरीच साजरी करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यंदा वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणे टाळले. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुंबईतील राजभवनासमोर निदर्शने केल्यानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

एएनआयचे ट्वीट- 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारनं नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. मात्र, सरकारच्या गाईडलाईनला काही नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. प्रतिकात्मक बकऱ्याची कुर्बानी होऊ शकत नाही किंवा ऑनलाइन खरेदी होऊ शकत नाही. प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी असल्याने उद्धव ठाकरे सरकारची ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारत नसल्याचे नसीम खान यांनी म्हटले आहे. तसेच सरकारनं तात्काळ बैठक घेऊन या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावा, असेही नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे.