CM Uddhav Thackeray | (Photo Credits: CMO)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना प्रदीर्घ काळानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबई येथील एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन शस्त्रक्रिया (Cervical Spine Surgery) झाली होती. त्यानंतर त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. पुरेशी विश्रांती घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आज (2 डिसेंबर) डिस्चार्ज (CM Uddhav Thackeray Discharge) देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय निवास्थान वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मात्र, पुढील काही काळ घरुनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या वेळी त्यांच्यासोबत सुपुत्र, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिमागील काही दिवसांपासून मणक्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे एका जाहीर कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून भाषण करताना दिसले होते. पुढे त्यांचा त्रास अधिक वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ही शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्याने तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणालाही भेट दिली नव्हती. ऐन दिवाळी असूनही उद्धव यांनी मान्यवरांची भेट टाळली होती. (हेही वाचा, Param Bir Singh Suspension Likely Today: परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नस्तीवर स्वाक्षरी केल्याची चर्चा)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील मुंबई दौऱ्यावर होत्या. त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. मात्र, त्यांनाही ही भेट मिळू शकली नव्हती. आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे हे थेट वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान,  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी आज अधिकृतरित्या सांगितले. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे'.

ट्विट

उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया मुंबईतील गिरगावातील एच. एन. रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. तरीही त्यांनी कोरोनाचा नवा व्हेरीएंट अमिक्रॉन नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयातूनही कामाचा धडाका कायम ठेवला होता.