Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. अलीकडेच आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बीएमसीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेवर प्रश्न उपस्थित केले होते. निविदा न काढता, चर्चा न करता कामे देण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरही (Davos Visit) प्रश्न उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी काही ट्वीट करत दावोस दौऱ्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

आदित्य ठाकरे म्हणतात, ‘मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचा सखोल अभ्यास केल्यास अनेक बाबी समोर येतात. 16 ते 20 या कालावधीत शासनाचा अधिकृत कार्यक्रम ठरला होता. या चार दिवसांत सरासरी 40 कोटींचा खर्च झाला आहे. म्हणजेच दररोज दहा कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशात मुख्यमंत्री त्या ठिकाणी उशिरा पोहोचले. सरकारी खर्चाने चार्टर विमानाने ते गेले, मात्र उशिरा पोहोचल्याने त्यांचा पहिला संपूर्ण कामकाजाचा दिवस वाया गेला. महाराष्ट्र पॅव्हेलियनचेही उशिरा उद्घाटन झाले. त्यांनी बैठका घेतल्या नसल्याचेही दिसून येत आहे.’

ठाकरे पुढे म्हणतात, ‘मुख्यमंत्री फक्त एक संपूर्ण दिवस तिथे होते. त्यावेळी त्यांनी कोणाशी बैठका घेतल्या याची माहिती समोर आली नाही. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री रात्रीच मुंबईत परतले. एका इतक्या मोठ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उशिरा पोहोचले, लवकर परत आले, तर मग 40 कोटी खर्च का केले? दावोसमध्ये सुमारे 28 तासांसाठी जवळपास 35 ते 40 कोटी खर्च केले. या दौऱ्याचे वेळापत्रक/ट्विट/माहिती सार्वजनिकपणे दिली जात नाही. तेथे नेमके काय घडले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सरकारी एमआयडीसीनेही अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.’ (हेही वाचा: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत केंद्रीय मंत्री Amit Shah यांच्यासोबत चर्चा झाली नाही पण लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - देवेंद्र फडणवीस)

आदित्य ठाकरे म्हणतात, ‘13 डिसेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने मंजूर केलेल्या आणि मीडियामध्ये जाहीर केलेल्या 4 कंपन्यांना दावोसच्या यादीत दाखवले गेले. सर्व उपलब्ध ट्विट आणि प्रेस नोट्समध्ये, कोणत्याही सामंजस्य कराराच्या कोणत्याही क्षेत्राची/विशिष्ट गोष्टींची स्पष्टता नाही.’

अखेर ठाकरे म्हणतात, ‘महाराष्ट्रातील नागरिकांना असंवैधानिक मुख्यमंत्र्यांकडून लाइव्ह टीव्हीवर वैयक्तिकरित्या काही गोष्टी समजून घ्यायला आवडतील- 1) जास्त खर्च करूनही त्यांनी दावोसला कमी महत्त्व का दिले? 2) संपूर्ण वेळापत्रक  सार्वजनिक का केले नाही? 3) प्रत्येक कंपनीची गुंतवणूक आणि क्षेत्र मुख्यमंत्र्यांनी थोडक्यात स्पष्ट करावे.’