राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना प्रचंड थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या बाजूला सर्व दौरे रद्द करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीला धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट यांच्यासह विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्यपाल यांच्यावतीने दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (4 ऑगस्ट) सुनावणी झाली. यानंतर राज्याच्या राजकारणातही वेगवान हालचाली घडू लागल्या आहेत.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन महिना उलटत आला तरीही अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या दोघांनीच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारच झाला नाही. परिणामी राज्यशकट हे दोघेच चालवत आहे. याचा धोरणात्मक निर्णयांवर मोठा परिणाम होतो आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या शिवसेना पक्ष चिन्ह बाबत तातडीने निर्णय न देण्याच्या निवडणूक आयोगाला सूचना तर विस्तारीत खंडपीठाबाबतचा निर्णय 8 ऑगस्टला!)
दरम्यान, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही होऊ घातले आहे. विधिमंडळ अधिवेशनाची आगोदर जाहीर झालेली तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अद्याप नवी तारीख जाहीर झाली नाही. ती लवकरच जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करणे अनिवार्य होऊन बसले आहे. अशात एका बाजूला न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारवर प्रचंड टीकास्त्र सोडले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजप या दोघांबद्दलही जनतेच्या मनात साशंकता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार का? याबाबत उत्सुकता आहे.