अमेरिकेच्या Times Square च्या धर्तीवर बदलणार मुंबईच्या CSMT Junction परिसराचं रूपडं !
CSMT Junction (Photo credit : Instagram )

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्निमल्स जंक्शनचं (CSMT Junction) लवकरच रूप पालटणार आहे. आता सीएसएमटी परिसर पादचार्‍यांसाठी अधिक सोयीस्करच्या करण्याच्या संकल्पनेतून अमेरिकेतील न्युयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर (Times Square) प्रमाणे साकारण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

काम-धंद्यासाठी, मुंबई विद्यापीठात शिकण्यासाठी अनेकजण सीएसएमटी परिसरात येतात. त्यामुळे दिवसभर हा परिसर वर्दळीचा असतो. नॅशनल असोसिएशन ऑफ सिटी ट्रान्स्पोर्ट (NATCO), ग्लोबल डिझाईनिंग सिटीज इनिशिएटीव्ह (GDCI) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी 2017 साली मालाड येथील मीठ चौकी जंक्शन परिसराचं रूप पालटण्यात आलं होतं. आता (GDCI)मुंबईतील सीएसएमटी परिसर पादचार्‍यांसाठी अधिक सोयीस्कर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामध्ये पेंट आणि बॅरिकेट्सचा कल्पकतेने वापर केला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेनेदेखील सीएसएमटी परिसराचं रूपडं बदलणार्‍या या प्रोजेक्टला संमती दिली आहे. वापरात नसलेल्या रस्त्याच्या भागाला कल्पकतेने सजवले जाणार आहे, फूड प्लाझा उभारण्यात येणार आहे, ग्रास पॅच बनवले जाणार आहेत. मात्र हे करताना मोटारसायकल चालवणार्‍यांच्या मार्गात बदल न करता इतर भाग आकर्ष्क बनवण्याचं आव्हान GDCIसमोर आहे. मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोर एक सेल्फी पॉईंट आहे मात्र इतर ठिकाणीही नव्या पॉईंटसची खास निर्मिती केली जाणार आहे.

सीएसएमटी प्रमाणेच मुंबईतील 19 अन्य ठिकाणीदेखील कल्पकतेने काही गोष्टी बदलण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे मुंबईचं हे बदलत रूपडं त्याचा ताण, धक्काबुक्कीचा प्रवास आणि इतर टेंशन्सना दूर सारून आनंददायी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.