Mumbai Airport Shut: मुंबई विमानतळ सहा तासांसाठी बंद... एकही विमान उड्डाण भरणार नाही
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

Mumbai Airport News: कधीही न थांबणाऱ्या मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) कधी नव्हे ते चक्क 6 तासांसाठी बंद राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सहा तासात याविमानतळावरुन कोणतेही विमान उड्डाण भरणार नाही. प्राप्त माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबरला सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे विमानतळ बंद असणार आहे. विमानतळावरील दोन्ही धावपट्यांची देखभाल दुरुस्ती आणि इतरही काही डागडुजीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे विमानतळ ऑपरेटरने म्हटले आहे.

विमानतळ ऑपरेटरने दिलेल्या माहितनुसार, CSMIA वरील सर्व धावपट्ट्यांची पावसाळ्यानंतर देखभाल केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता ते 17:00 या कालावधीत वाहतुकीसाठी उपलब्ध असणार नाहीत. सीएसएमआयएला (CSMIA) प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीत पूर्ण करणे सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सहाजिक या शहरामध्ये जागतिक प्रवाशांचा वावर असतो. अशा वेळी इतक्या प्रदीर्घ काळासाठी विमानतळ बंद ठेवणे हे अनेक अर्थाने गैरसोयीचे आहे. त्यामुळे संभाव्य विचार करुन सीएसएमआयएने याबाबत आगोदरच माहिती दिली होती. तसेच, सर्व संबंधित यंत्रणांना आगावू सूचनाही दिल्या होत्या. विमानतळावर पायाभूत सुविधा चांगल्या असाव्यात यासाठी आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यामुळे एअरमेनला नोटीस (NOTAM) एअरलाइन्स आणि इतरांना सहा महिन्यापूर्वीच आवश्यक नोटीस देण्यात आली आहे.

अर्थात विमानतळ केवळ सहा तासांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी फार चिंता करण्याचे कारण नाही. निश्चित वेळासाठी विमानतळ उड्डाणासाठी बंद राहील आणि निश्चित वेळातच ते वाहतूकीसाठी म्हणजेच उड्डाणासाठी सज्जही राहील. त्यामुळे प्रवाशांनी फार चिंता करण्याचे कारण नाही. दुसऱ्या बाजूला इतर विमान कंपन्यांनाही सहा महिने आगोदरच कल्पना देण्यात आल्याने त्यांनाही नियोजनासाठी पूरेसा वेळ मिळाला असल्याचे सांगण्यात आले आहे.