छठ पूजा (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई मध्ये दिवाळीची (Diwali) धामधूम झाल्यानंतर आता उत्तर भारतीयांमध्ये छटपूजेबाबत उत्सुकता आहे. मुंबई महानगर पालिकेकडेकडून यंदा छटपूजेला (Chhath Puja) सशर्त परवानगी देण्यात आली आहे. छटपूजा या वर्षी 10 नोव्हेंबर दिवशी साजरी करण्यात येणार आहे. मात्र या पूजेसाठी समुद्रकिनारी गर्दी टाळण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे. समुद्रकिनार्‍यांऐवजी भाविकांनी आर्टिफिशिअल पॉन्ड्स बनवून पूजा करावी ज्यामुळे कोविड 19 (COVID 19) च्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यास मदत होईल असं सांगण्यात आलं आहे. पालिकेने नुकतीच गाईडलाईन जारी करताना पोलिसांनी देखील गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असं म्हटलं आहे.

बीएमसी कडून समुद्रकिनारी छटपूजा करण्यास मनाई करण्यात आल्याने भाजपा कडून विरोध करण्यात आला आहे. भाजपाने कृत्रिम तलाव बनवून पूजा करण्याच्या सूचनेचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान बिहार आणि उत्तर प्रदेश मधील लोकं छटपूजा हा सण साजरा करतात. छटपूजेचे विधी 8 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून पुढील 3 दिवस ते चालणार आहेत. या छटपूजेमध्ये प्रामुख्याने सूर्यनारायणाची पूजा केली जाते.

कोविड जागतिक महामारीच्या पूर्वी छटपूजेनिमित्त मुंबई च्या जुहू बीच, गिरगाव चौपाटी, अक्सा बीच, पवई या भागामध्ये भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत असे पण यंदा हे सारे विधी समुद्र किनारी ऐवजी कृत्रिम तलावात करण्याचे आदेश आहेत.

छटपूजेसाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावाजवळही केवळ 50% उपस्थितीमध्ये कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन आहे. यामध्ये 200 पेक्षा जास्त लोकं एकत्र जमू नये. बंद ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोकं एकत्र येऊ शकत नाहीत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. ध्वनीप्रदूषण टाळा. आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय टीम तैनात ठेवण्याचे आदेश आहेत. दरम्यान नियमभंग केल्यास कडक कारवाईचा सामना करावा लागेल असे आदेश देण्यात आले आहेत.