नाशिक जिल्हा रुग्णालयांतील प्रशासनाच्या हलगर्जीपणावर छगन भुजबळ भडकले; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना पाठवले सक्तीच्या रजेवर - रिपोर्ट्स
Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

मुंबई, पुणे, नागपूर प्रमाणेच राज्यात नाशिक मध्येही कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. शहर आणि ग्रामीण भागामध्ये वाढता कोरोना पाहता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेली काही ठिकाणी गलथान कारभार सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. यामध्ये भुजबळांनी नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ रत्ना रावखंडे (Dr. Ratna Raokhande) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्स ने दिले आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयांतील असुविधांबाबत समाधानकारक उत्तर न देता आल्यानं ही कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा:    Coronavirus In Nashik: नाशिक येथे Oxygen Cylinder सह आंदोलन करणाऱ्या कोरोना रुग्णाचा मृत्यू.

नाशिक जिल्ह्यासाठी 228 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्यापैकी 196 बसवण्यात आले असून ग्रामीण नाशिक मध्ये 7, जिल्हा रूग्णालयात 7 असे 14 रूग्ण सध्या व्हेंटिलेटर वर आहेत. जिल्हा रूग्णालयातही 80 पैकी 7 वापरामध्ये आहेत. 73 व्हेंटिलेटर नॉन कोविड भागात पडून आहेत तर 23 अजून सुरूच केलेले नाहीत अशी परिस्थिती आहे. वास्तवात अनेक जण व्हेंटिलेटर अभावी मृत्यूमुखी पडत आहेत आणि जिल्हा रूग्णालयात कामामध्ये हलगर्जीपणा सुरू आहे. यावरून छगन भुजबळ भडकलेले पहायला मिळाले.

नुकताच एका व्यक्तीचा नाशिक मध्ये बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. यामध्ये कोरोनाबाधित रूग्णाने बेड न मिळाल्याने नाशिक महानगरपालिकेबाहेर बसून आंदोलन केले. त्यानंतर बेड देण्यात आला पण काही तासांतच तो रूग्ण दगवला. या घटनेची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. आजही छगन भुजबळ यांनी अद्याप नाशिक मध्ये लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही मात्र तसे करण्याचा निर्णय झाल्यास किमान 3 दिवसांचा वेळ देऊ असे देखील सांगितले आहे.