Palghar: पालघरमध्ये केमिकलने भरलेला टँकर उलटला; राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

पालघर (Palghar) जिल्ह्यात केमिकलने भरलेला टँकर (Chemical Tanker) उलटल्याने राज्य महामार्गावर काही तास वाहतूक ठप्प झाली. पोलीस आणि अग्निशिन दलाने योग्य ती खबरदारी घेऊन कोणताही धोका नसल्याची खात्री केली. काही काळ ठप्प झालेली वाहतूक त्यानंतर सुरळीत सुरु झाली असे पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी घडली. प्राप्त माहितीनुसार, ही घटना बोईसर चिल्लर रस्त्यावर सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. टॅंकचे मात्र मोठे नुकसान झाले, पालघर पोलिस पीआरओ सचिन नावडकर यांनी पीटीआयला सांगितले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, रंगांच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे रसायन घेऊन जाणारा टँकर मुंबईहून तारापूरकडे निघाला होता. दरम्यान, हा टँकर वारंगडे गावात उलटला. टँकर रस्त्यावरून हटेपर्यंत दोन तास राज्य महामार्गावर वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Mumbai- Pune Traffic Update: मुंंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ उलटला तेलाचा टॅंकर, वाहतुक विस्कळीत)

मुंबई गोवा महामार्गावर, लांजा तालुक्यातील अंजनारी नदीवरील पुलावरनही काही दिवसांपूर्वीच एक टँकर उलटला होता. काही दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती. त्यामुळे केमीकलचे टँकर उलटण्याचे प्रमाण अलिकडील काही काळात वाढले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अंजनारी पूलावरून कोसळलेल्या अपघातग्रस्त टॅंकर मध्ये एलपीजी गॅस भरलेला होता. 18 मॅट्रिक टन गॅस भरलेला टॅंकर कोसळल्याने पहिल्यांदा सुरक्षेच्या कारणास्तव तो रहदारीसाठी बंद करण्यात आला. नदीत कोसळलेल्या टॅंकर मधून गॅस गळती होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. टॅंकरमध्ये भरलेला गॅस दुसर्‍या टॅंकर मध्ये भरण्यासाठी काल (23 सप्टेंबर) एक पथक तैनात करण्यात आले होते. अपघातग्रस्त टॅंकर मधून गॅस दुसर्‍या टॅंकर मध्ये भरण्यात यश आलं आहे. यासाठी उरण आणि गोवा मधून तज्ञांनी टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांच्या देखरेखीखाली गॅस दुसर्‍या टॅंकर मध्ये भरण्याचे काम पूर्ण झाले.