सोशल मीडीयामध्ये अनेक गोष्टी वायरल होत असतात. त्यामध्ये अधिकृत सूत्रांच्या हवाल्याशिवायच अनेक गोष्टी दिलेल्या असल्याने बहुतेकदा खोटी वृत्त वायरल होत असतात. सध्या सोशल मीडीयात महाराष्ट्रात लवकरच 21 जिल्हे होणार असल्याचं वृत्त वायरल होत आहे. सोशल मीडीयात त्याबाबतची माहिती शेअर होत आहे. वायरल वृत्तामध्ये 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्यात कोणताही नवा जिल्हा निर्माण होणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडीयात वायरल होत असलेले दावे खोटे असल्याचं आता स्पष्ट झाले आहे.
नागपूर मध्ये आज मीडीयाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्यांवरील ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे ऑफिस असा प्रस्ताव महसूल खात्याकडे असल्याचं म्हटलं आहे पण सध्या राज्यात कोठेही नवा जिल्हा निर्माण करण्याचा मानस नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी जनगणनेनंतर नव्या जिल्ह्याच्या निर्मितीचा निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.