ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तब्बल दोन महिन्यांनंतर पर्यटनासाठी खुला
Tiger | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे (Covid-19 Second Wave) राज्यात मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळेच अनेक पर्यटन स्थळे देखील बंद होती. मात्र 7 जून पासून अनलॉक प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होत आहेत. यातच आता चंद्रपूर (Chandrapur) मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प (Tadoba-Andhari National Park) देखील काही नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल दोन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी पुन्हा सुरु झाला आहे. यासंदर्भातील माहिती ताडोबा व्यवस्थापनाने प्रसिद्धीपत्रक जारी करुन दिली आहे.

आता या सफारी दिवसातून ठरवून दिलेल्या 2 टप्प्यात होणार आहेत. त्यासाठी 6 प्रवेशद्वारावरून क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना परवानगी दिली जाईल. थेट प्रवेशद्वारावर पर्यंटकांना बुकिंग करावे लागणार आहे. पर्यटकांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक करण्यात आले आहे. तर कोविडसदृश्य लक्षणं आढळल्यास एखाद्या पर्यटकाला प्रवेश नाकारणार येणार आहे. 1 जुलै पासून नियमाप्रमाणे पावसाळ्यात ताडोबा कोअर क्षेत्र 4 महिने बंद असणार आहे. मात्र बफर क्षेत्रात 1 जुलै पासून पर्यटन सुरू राहण्याची शक्यता आहे. (ताडोबा व्याघ्र प्रकल्प 30 एप्रिल पर्यंत पर्यटकांसाठी बंद; बुकींग रक्कम परत मिळणार)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे 15 एप्रिल 2021 पासून व्याघ्र प्रकल्प सफारीसाठी बंद होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार, 4 जून पासून पर्यटनासंबंधी गतिविधी राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. तर 30 जून पर्यंत कोअरभागात सफारी सुरू करण्यास परवानगी असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या एका आदेशात म्हटले होते. दरम्यान, ऐन हंगामात पर्यटन बंद असल्याने हजारो लोकांना फटका बसला आहे. मात्र आता पुन्हा पर्यटन हळूहळू सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.