Tiger (Photo Credits: National Geographic)

महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) येथील कॉंग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर (Congress MP Suresh Dhanorkar) यांनी प्रदेशातील वन अधिकाऱ्यांना एका नरभक्षक वाघाला (Tiger) ठार मारण्यास सांगितले आहे. या वाघाने गेल्या वर्षी जानेवारीपासून जवळजवळ आठ शेतकऱ्यांचा व 25 गुरांचा बळी घेतला असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या वाघाच्या हल्ल्यात काही जण जखमीही झाले आहेत. विशेष पथकांनी त्याला पकडण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरल्यानंतर आता त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, विरूर या वनक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला आहे.

शनिवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, राज्यातील एकमेव कॉंग्रेसचे खासदार असलेले धानोरकर म्हणाले की, या वाघाच्या दहशतीमुळे मध्य चांदा वनविभागाचा भाग असलेल्या राजुरा तहसीलमधील डझनभराहून अधिक खेड्यांतील नागरिक घाबरून गेले आहेत आणि त्याचा शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. शेती हा इथल्या लोकांचा मुख्य आधार आहे, मात्र वाघाच्या भीतीने हे लोक कामावर जात नाहीत. या वाघाला पकडण्यासाठी खास पथकाची स्थापना केली होती, 100 पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले होते, 30 मचाण, 4 शूटर्स, अनेक वन कर्मचारी मिळूनही या वाघाला पकडू शकले नाहीत.

धानोरकर यांनी याबाबत मुख्य वन संरक्षक एनआर प्रवीण यांच्याशी बैठक घेतली आहे आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी RT-1 नावाच्या वाघाबद्दल फोनवर बोलणे झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चांदा विभागाचे वनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या अंतर्गत, विरूर, राजुरा आणि कोठारी परिक्षेत्रात कॅमेरा ट्रॅप व इतर उपकरणांनी सज्ज असलेल्या दीडशेहून अधिक जवानांची स्थापना करण्यात आली होती. मात्र त्यांनाही या वाघाला पकडण्यास अपयश आले. (हेही वाचा: Mumbai Metro Car Shed: मुंबई मेट्रो साठी Aarey Colony ऐवजी कांजूरमार्ग मध्ये नवं कारशेड)

हा वाघ साधारण पाच ते सहा वर्षांचा असावा असा अंदाज आहे तसेच वेगाने धावून भक्ष्याची शिकार करण्याची त्याची वृत्ती नसावी व म्हणून तो शेतकऱ्यांवर हल्ले करीत आहे.