मुंबईत विशेषत: बदलापूर-वांगणी (Badlapur-Vangani) दरम्यान शुक्रवारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज जरी थोडी विश्रांती घेतली असली तरीही शनिवार-रविवार हा परिसर पाण्यात अक्षरश: बुडालेला होता. याचा सर्वाधिक फटका बसला तो रेल्वेमार्गाला. त्यात रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे आणि तेथील परिसरातील पूरजन्य परिस्थितीमुळे बदलापूर-वांगणी दरम्यान 17 तास रखडलेली महालक्ष्मी एक्सप्रेस (Mahalaxmi Express) हे त्याचेच एक ज्वलंत उदाहरण. हे सर्व पाहता बदलापूर-वांगणी मार्गावरील रुळांची उंची वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला आहे. कमी उंचीच्या रुळांमुळे महालक्ष्मी एक्सप्रेस या रखडल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मटा ने दिलेल्या बातमीनुसार, बदलापूर-वांगणी परिसरात पूरस्थितीमुळे रेल्वेसेवेची पूर्णत: वाताहत झाली होती. हे टाळण्यासाठी बदलापूर-वांगणी मार्गावरील रुळांची उंची २०० मि.मी.पर्यंत रुळांची उंची वाढवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील रुळांच्या परिसरात पाणी भरणाऱ्या संवेदनशील ठिकाणी गस्त पथकाची नियुक्ती करून तेथे गस्त घालण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे मुंबई विभागातील अधिकृत अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी या रेल्वेमार्गावर रखडलेली महालक्ष्मी एक्सप्रेस मुसळधार पाऊस आणि रुळांच्या सभोवतालचा परिसर पाण्याखाली गेल्याने सुरक्षित स्थळी शक्य नव्हते. त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अभियांत्रिकी विभागांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याचा फटका येथील रेल्वेसेवेलाही बसला. त्या सुरळीत होण्यास सोमवारचा दिवस उजाडावा लागला. त्यामुळे या मार्गावर रेल्वेसेवा जरी सुरु झाली असली तरीही तरी ती पूर्ववत होण्यास थोडा विलंब लागेल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.