
अभिनेत्री दीपाली सय्यद ( Deepali Sayyad) यांनी 3 ऑक्टोबच्या रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केला व आज (4 ऑक्टोबर) सकाळी त्यांनी मुंब्रा-कळवा या विधानसभा मटारदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. त्या शिवसेनेतून निवडणूक लढत असल्या तरी त्यांचा राजकीय इतिहास मात्र तसा जुनाच आहे.
अचानक झालेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्याची भावना पसरली असली तरी दीपाली यांनी लेटेस्टली मराठीसोबतच्या मुलाखतीत कबूल केले की त्यांचा का निर्णय आधीच ठरला होता. "माझा हा निर्णय 2 ते 3 दिवस आधीच झाला होता. फक्त औपचारिक प्रवेश मी काल केला."
मुंब्रा- कळवा हा मतदार संघ निवडण्यामागचं कारण स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, "या मतदार संघात अनेक वर्षे राष्ट्रवादीचं राज्य राहिलं आहे. आणि त्यामुळेच हा भाग खूपच अविकसित राहिला आहे. त्याचाच विकास करण्यासाठी माझी पक्षाकडून निवड झाली आहे."
अनेकदा राजकीय पक्षांकडून सेलिब्रिटींना तिकीट दिले जाते. तुम्हीही सेलिब्रिटी आहात म्हणून लोक तुम्हाला मतं देतील असं वाटतं का, असा प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या, "मी केलेली कामं लोकांना माहित आहेत. आणि सेलिब्रिटींचा चेहरा नेहमीच सगळ्यांच्या ओळखीतला असतो, ज्यामुळे नक्कीच सेलिब्रिटी स्टेटसची निवडणुकीत मदत होईल."
दीपाली त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल म्हणाल्या, "मी राजकारणात नवी नाही. या आधी लोकसभा निवडणूकदेखील मी लढवली आहे. आताही लोकांसाठी काही तरी चांगलं करायचं आहे ज्यामुळे मी निवडणूक लढवायचं ठरवलं."