लोकसभेपासून भाजपने सुरु केलेले तोडफोडीचे राजकारण विधानसभेवेळीही (Maharashtra Assembly Election) पाहायला मिळाले. आज उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना, रात्री उशिरा अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोबत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत, सौ. रश्मीताई ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सय्यद यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेने दिपाली सय्यद यांना काळवा-मुंब्रा येथून उमेदवारी दिली आहे. दिपाली सय्यद उद्या, 4 सप्टेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रीय असलेल्या दिपाली सय्यद यांच्यामुळे शिवसेनेला एक तगडा उमेदवार मिळाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना ट्विट -
अभिनेत्री @deepalisayed जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/OMxirUixaZ
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 3, 2019
कळवा मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांनी, शिवसेनेच्या दशरथ पाटील यांचा पराभव केला होता. मात्र आता दिपाली सय्यद यांच्या रूपाने आव्हाड यांना मोठे आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचे वर्चस्व आहे त्यामुळे शिवसेनेने मुस्लीम सेलिब्रिटी इथे उभा केला आहे. (हेही वाचा: अखेर अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे उपोषण मागे; पालकमंत्र्यांनी केली मध्यस्थी, पुन्हा नवे आश्वासन)
काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा राहिलेल्या दिपाली सय्यद यांनी, नगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी आमरण उपोषणाचे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे त्यांना एक नवीन चेहरा प्राप्त झाला होता, जनसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली होती. या सर्वांचा फायदा शिवसेनेन होण्याची शक्यता आहे. दिपाली सय्यद यांनी 2014 साली आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला होता.