उपोषणाला बसलेल्या दिपाली सय्यद (संग्रहित संपादित प्रतिमा)

अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील साकळाई उपसा जलसिंचन योजनेला (Sakhalai Water Irrigation Scheme) मंजुरी मिळावी म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyad) ग्रामस्थांसह उपोषणाला बसल्या होत्या. आज पालकमंत्री राम शिंदे यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्ती केली. त्यानंतर जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला व आता दिपाली सय्यद यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. पूरपरिस्थिती आटोक्यात आल्यावर या योजनेबाबत मुंबईत बैठक घेऊन आपण यावर तोडगा काढू असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे. याआधी खुद्द मुख्यमंत्री साहेबांनीही आश्वासन दिले होते मात्र घडले काहीच नाही. आतातरी या ग्रामस्थांना न्याय मिळतो ते लवकरच समजेल.

सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषद आवारात उपोषण सुरू केले होते. आता महाजन यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे 1 सप्टेंबरपर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही तर 2 सप्टेंबरपासून आपण पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा सय्यद यांनी दिला आहे. साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. या साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळावे यासाठी दिपाली सय्यद यांचे प्रयत्न चालू आहेत. ही योजना मंजूर झाली नाही तर क्रांती दिवसापासून आपण उपोषण सुरु करू असा इशारा त्यांनी दिला होता. (हेही वाचा: अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे आमरण उपोषण सुरु; मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही आश्वासन, जाणून घ्या काय आहे मागणी)

याआधी लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता विधानसभा निवडणुका येतील तरी हे आश्वासन पूर्ण झाले नाही. याबाबत दिपाली सय्यद यांनी गेले दीड महिना गावोगावी फिरून ग्रामस्थांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यातून आपल्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला.