Dhananjay Mahadik Son's Wedding (Photo Credits: Twitter/ANI)

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे चिरंजीव पृथ्वीराज महाडिक यांचे काल (21 फेब्रुवारी) रोजी वैष्णवी हिच्यासोबत लग्न झाले. अनेक राजकीय नेते आणि दिग्गजांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी धनंजय महाडिक आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लग्नात शंभरहून अधिक पाहुणे उपस्थित होते. त्यापैकी अनेकांनी या लग्नसोहळ्यात मास्क देखील घातला नव्हता असे सांगण्यात येत आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉनमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.हेदेखील वाचा- मुंबईत लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना वाढला, BMC चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली माहिती

दरम्यान आजपासून राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच "राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल" असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले.

दरम्यान मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे. दरम्यान हॉटेल्स, बार, पब्ज, हॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेचे छापे टाकण्याचे काम सुरु आहे. यात कोरोना नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.